• Recommended Posts

  • Browse By Category

  • Browse By Timeline

“फासिस्ट”????


Whatsapp ग्रुप वर चाललेली पोलिटिकल debate  शेवटी कोणातरी कोणालातरी  “fascist ” म्हणून संपली. 

फोन थांबवून खाली ठेवला. खिडकीबाहेर काळाकुट्ट अंधार. “फासिस्ट”? खरोखर? हे बोलणाऱ्या माणसाला fascism ची खरोखर कितपत ओळख आहे? 

भारतीय राजकारणात माझा काही favorite पक्ष आहे. त्या पक्षाला आणि त्याच्या नेत्याला शिव्या दिल्या म्हणून मला तसा फारसा राग येत नाही. शेवटी तो राजकारणी आहे. संधीसाधू आहे. राजकारणात संत किंवा चोर हा choice  नसतोच. त्यातल्या त्यात कमी चोर एवढाच चॉईस असतो आणि हा मनुष्य कमी चोर आहे आणि बाकी चार चांगली कामे करतो एवढेच माझे म्हणणे. 

पण फॅसिसम चा उल्लेख नेहमीच मला अस्वस्थ करतो. अतिशय अस्वस्थ.  

काही वर्षांपूर्वी ची डखाव च्या छळछावणीला भेट दिली होती. बाहेरच्या दारावर “Work  makes you free ” अशी मोठी अक्षरे आहेत. आत जाताना अंगावर अक्षरशः शहारा येतो. बायको तर आत जाऊच शकली नाही. मला नाही सहन होणार म्हणाली. अनेक लोक रडत बाहेर पडताना दिसले. 

माझ्याही छातीचे ठोके वाढलेले. पण आत शिरलो. अरुंद रस्ते. दोन्ही बाजूच्या बरॅक सारख्या बिल्डिंगी. बराकींच्या एका टोकाला  एक अर्धवर्तुळाकार भिंत जिथे लोकांना गोळ्या घातल्या जायच्या. दुसऱ्या टोकाला गॅस चेंबर. त्यापलीकडे एक बाग. बागेत शांत झाडे. काही झाडांना फुले आलेली. पाटी वाचल्यावर कळले कि लोकांना  गॅस चेंबर मध्ये मारून मग crematorium  मध्ये जाळून ती राख या बागेत टाकली जायची. तसाच मागे फिरून बागेबाहेर पडलो पण पाय थरथरत होते.  त्यानंतर अनेक ठिकाणे पाहिली. Anne Frank चे घर पाहिले. अमेरिकेतील होलोकॉस्ट म्युसिअम पाहिले.  

Fasicm  बरोबर ही पहिलीच गाठभेट नव्हती. याहीपुर्वी Fasicm माझ्या आयुष्यात अजून एकदा चटका लावून गेला होता. मरेपर्यंत विसरणार नाही अशी आठवण देऊन गेला होता. बाबा कॅन्सर ने गेल्यावर कॅन्सर आणि त्याचे रुग्ण, विशेषतः त्यांचा कॅन्सर जर बरा होत नसेल तर तो शेवटचा प्रवास, या विषयाने मला झपाटून टाकले होते. अमेरिकेत परत आल्यावर एका हॉस्पिस सेंटर मध्ये, म्हणजे जिथे ज्यांचा कॅन्सर बरा होणार नाही अशा रुग्णांना ठेवतात तिथे, मी volunteering  करायला सुरवात केली. काही लोकांच्या यातना हि पाहिल्या , काही लोकांची यातनांतून झालेली शेवटची सुटका हि पाहिली. एक गोष्ट मला जाणवली कि ज्यांचा कॅन्सर बरा होण्याची आशा आहे ते लोक जास्त tension  मध्ये असतात. ज्यांची आशा सुटलेली असते ते मृत्यूला शरण गेलेले असतात. जो दिवस चांगला जातो तो हसत घालवतात. वेदना होतात तेव्हा रडतात, पण मॉर्फीन दिल्यावर शांत झोपतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा हसतात. मनाची खोटी समजूत घालायचे त्यांनी थांबवलेले असते. आलेल्या क्षणात ते फक्त त्या क्षणासाठीच जगात असतात. 

असाच एका दिवशी एक जक्ख म्हातारा आला. त्याला आपण सोयीसाठी “जो” म्हणू. जो माझ्या शिफ्ट लाच ऍडमिट झाला. मी आणि एक नर्स त्याचे कपडे बदलत होतो तेव्हा त्याच्या हातावरचा एक डाग दिसला. केमोथेरपी घेणाऱ्यांच्या हातावर अनेकदा सलाईन लावले असेल तिथे असा डाग दिसतो. पण केमोथेरपी चा डाग अस्ताव्यस्त पसरलेला असतो. जो च्या हातावरचा डाग व्यवस्थित आयताकार होता. मी सिस्टर ला ते दाखवले. 

सिस्टर ने जे सांगितले ते ऐकून काळजाचा ठोका चुकला. जो हा नाझी छळछावणीतून वाचलेला ज्यू माणूस होता. नाझी छावणीत असताना त्यांच्या हातावर एक नंबर गोंदवला जायचा. प्रेतांची विल्हेवाट वगैरे लावताना रेकॉर्ड ठेवायला असा नंबर बरा पडायचा. छळछावणी तुन जे थोडे बहुत लोक वाचले, त्यांनी हा नंबर पुसून टाकायचा प्रयत्न केला. तोच तो राहिलेला डाग. 

दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा जो शुद्धीत होता. पेपर वाचत होता. सिस्टर च्या वॉर्निंग प्रमाणे मी त्या डागांबद्दल काही विषय काढला नाही. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोललो. त्याने मला विचारले कि तू इंडिया मधून आहेस का. हो म्हटल्यावर त्याने एक मनापासून स्माईल दिले. त्याला क्रिकेट बद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट होता. एक पाय मरणाच्या दारात होता पण बुद्धी आणि स्मरणशक्ती तल्लख होती. जवळजवळ एक तास त्याच्याशी बोलत होतो. पण नंतर मी त्याला बाय करून दुसऱ्या कोणाशी बोलायला गेलो. परत जाताना त्याच्या रूम समोरून गेलो तर तो खिडकीबाहेर शून्य नजरेने बघत होता. ते शून्य नजरेने बघणे कुठेतरी कायमचे मनावर कोरले गेले. 

नंतर चे दोन तीन दिवस माझे जाणे झाले नाही. मग मला वाटते रविवारी मी गेलो. सिस्टर ने सांगितले की जो अंतिम घटका मोजतो आहे. त्याच्या रूम मध्ये गेलो आणि त्याचा हात हातात घेऊन बसून राहिलो. असे बसण्याला “सायलेंट angel ” बनणे म्हणायचे त्या हॉस्पिस सेंटर मध्ये. 

थोड्या वेळाने जो चा हात थंड पडत असल्याची जाणीव झाली. सिस्टर ला हाक मारली . तिने येऊन स्टेथोस्कोप ने नाडी तपासली आणि स्टेथॉस्कोने ची घडी करून त्याचे डोळे मिटले. तिने माझ्याकडे बघून मान हलवली आणि मी उठून निघालो. 

यानंतर त्यावेळा उठ सुठ fasicm चा उल्लेख होतो त्यावेळा मला डखाव च्या छळछावणीत रांगेत उभे राहिलेले अनेक जो दिसतात. त्यांची भकास  शून्य नजर भिंतीपलीकडे  कुठेतरी स्थिरावलेली  दिसते. विजेच्या कुंपणावर फेकलेली निष्पाप मुले दिसतात. निर्दय नाझी सैनिकांसमोर नग्नावस्थेत आंघोळ करायला लागल्यामुळे शरमेने अर्धमेल्या झालेल्या स्त्रिया दिसतात. आणि लोकांना एकाच विनंती करवीशे वाटते, की जे लोक खरोखरच fascism  ला बळी पडलेले आहेत त्यांना एक आदर म्हणून fasicm चा आरोप कोणावर करताना जपून करा. तुम्ही ज्याच्यावर हा आरोप करत आहात तो खरोखरच तुम्हाला गॅस चेंबर मध्ये मारणार आहे? जरा विचार करा. 

पुन्हा सांगतो, कोणालाही टीका करण्यावर माझा आक्षेप नाही. चोर, लुटारु,  बिनडोक, देशद्रोही, खुशाल कोणीही कोणालाही नावे ठेवा. फक्त मनुष्यस्वभावाचा जो सगळ्यात भयंकर अविष्कार, फासिस्ट, त्याबद्दल फक्त माझा आक्षेप आहे. पण शेवटी निर्णय तुमचा. 

केदार सोमण 

Leave a comment